रायगड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच विरोधकांनी वेगवेगळे आक्षेप घेतले. काहीजण न्यायालयातदेखील गेले. हा प्रश्न खोडून काढणारा विजय असून या निवडणूकीत अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. हा विजय सर्व माझ्या कार्यकर्त्यांचा असून इंडिया आघाडीचा देशातील पहिला विजय आहे. याची मुहूर्त मेढ रायगड जिल्ह्यात रोवली गेली आहे, असे उदगार आ. जयंत पाटील यांनी रविवारी काढले. बँकेच्या संचालक मंडळाच्या विजयानंतर पाटील बोलत होते.
यावेळी माजी आ. पंडित पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जि.प. माजी सदस्या चित्रा पाटील, प्रदिप नाईक, ॲड. गौतम पाटील, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, वृषाली ठोसर, संजना कीर, जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे,ॲड. परेश देशमुख, यतीन घरत, संदीप घरत, संतोष जंगम, ॲड. सचिन जोशी, सुरेश घरत, विलास म्हात्र, शेकाप महिला आघाडी तालुका प्रमुख प्रिती पाटील, अशोक प्रधान, नागेश कुलकर्णी, द्वारकानाथ नाईक, राजेंद्र म्हात्रे, अनिल चोपडा असे अनेक पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित
याप्रसंगी आ. जयंत पाटील म्हणाले, गेली 30 वर्षापासून सहकार चळवळीत काम करीत आहे. बँकेचे कामकाज आधुनिक करून कमी कालावधीत बँकेची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बँकेची उलाढाल 35 कोटीवरून पाच हजार कोटीपर्यंत नेली आहे. जिल्हा बँकेप्रमाणे प्राथमिक संस्थांचे कामकाजदेखील अद्ययावत झाले पाहिजे या भूमिकेतून काम केले जाणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. सुरुवातीला अनेक विरोध झाले. मात्र त्या विरोधाला मात करीत शेकापने घवघवीत यश संपादन केले आहे. आपल्यावर ठेवलेला विश्वास हाच आपला विजय आहे. आजचा हा दिवस कधीही न विसरण्यासारखा आहे. चांगल्या मतांनी विजय मिळाला आहे. माणिक जगताप यांचे बँकेच्या जडणघडणीत चांगले योगदान राहिले आहे. त्यांची आठवण म्हणून त्यांचे बंधू हनुमान जगताप यांना बिनविरोध निवडून दिल्याचा आनंद आहे. अर्ज भरताना महाविकास आघाडी म्हणून भरला होता. आता मात्र महाविकास आघाडी इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट झाली आहे. त्यामुळे हा विजय इंडिया आघाडीचा आहे, असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.