दुरावस्था मध्ये जिल्हापरिषदेची शाळा

 गळके छत, पायाखाली चिखल तरीही ज्ञानाची ओढ


समोर उंच-उंच इमारतींचे जाळे, त्या सिमेंटच्या जंगलात तग धरुन असलेल्या खारघर जिल्हा परिषद शाळेची ती मोडकळीस आलेली इमारत. त्या इमारतीचे गळके छत, त्या पावसाच्या ठिबकणाऱ्या पाण्याने वर्गात निर्माण झालेला चिखल, अंधाराचे साम्राज्य अशी मानवनिर्मित संकटे आवासून उभी असतानाही त्या कठीण परिस्थितीतही विद्यार्थ्यांना असणारी शिक्षणाची ओढ आणि त्या विद्यार्थ्यांना ज्ञान देणारे दोन शिक्षक असे विदारक पण मनाला उभारी देणारे दृश्य खारघरच्या शाळेत दिसून आले. या एकूणच परिस्थितीवरुन जिल्हा परिषदेच्या शाळांकडे  होत असलेले दुर्लक्ष अधोरेखित झाले.अपुऱ्या जागेत दाटीवाटीने बसलेले विध्यार्थी, शाळेचे छप्पर गळत असल्याने विध्यर्थ्यांच्या पायांखाली झालेला चिखल आणि वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने वर्गात पसरलेला अंधार अशा स्थितीत 41 विद्यार्थ्यांना दोन शिक्षक प्राथमिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. असं जर कोणी सांगत असेल तर ऐकणाऱ्याला वाटेल की, हे कुठल्या तरी दुर्गम भागातील शाळेचं चित्र आहे. मात्र ही परिस्थिती कोणत्याही दुर्गम भागातील शाळेची नसून आधुनिक शहर म्हणून बिरूदावली मिरवणाऱ्या खारघर वसाहती मधील जिल्हा परिषदेच्या शाळेची ही अस्वस्था आहे.

      सिडकोने वसवलेल्या खारघर वसाहतीत फरशी पाडा या गावाचा समावेश आहे. या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिली ते चौथीपर्यत वर्ग असलेली शाळा चालवली जात आहे. 2010 साली सुरु करण्यात आलेल्या या शाळेच्या वास्तूसाठी अनिल शेळके या व्यक्तीने आपला भूखंड उपलब्ध करून दिला आहे. शाळेच्या वास्तूची डागडुजी तसेच शाळेला लागणारा इतर खर्च शेळके स्व कमाईतून करत होते. पालिकेच्या स्थापनेनंतर शाळेच्या वास्तुच्या दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेने मनाई केल्याने संबंधित शाळेच्या इमारतीचे काम रखडले आहे. परिणामी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्याना गलिच्छ आणि दुरवस्था झालेल्या जागेत शिक्षण घ्यावे लागत आहे.

     जिल्हा परिषदेचा फंड गेला परत खाजगी जागेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या या शाळेच्या डागडुजी करता जिल्हा परिषदे मार्फत फंड उपलब्ध करून देण्यात आला होता. डागडुजीला पालिकेची परवानगी नसल्याने हा फंड जिल्हा परिषदेकडे परत गेला आहे.

पालिका आणि जिल्हा परिषद वाद

पालिकेच्या स्थापनेनंतर पालिकेत समाविष्ट ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा पालिकेने आपल्याकडे हस्तांतरित करून घ्याव्या, अशी मागणी होत आहे. मात्र या करता जिल्हा परिषदेकडून टाकण्यात असलेल्या काही अटींमुळे पालिका प्रशासन या शाळा आपल्याकडे हस्तांतरीत करण्यास अनुकूल नसल्यानेच फरशी पाड्यातील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली आहे.

90 टक्के विद्यार्थी अमराठी

फरशी पाड्यातील चालवण्यात येणारी शाळा मराठी माध्यमाची आहे. मात्र या शाळेतील 90 टक्के विद्यार्थी हे अमराठी असून, परिसरातील घरकाम करणारे तसेच रोजंदारी करणाऱ्या कामगारांची ही मूल असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे. शाळेत शौचालय उपलब्ध नसल्याने विध्यार्थ्यांना आपल्या घरी शौचासाठी जावे लागत आहे.

शाळेतील विध्यर्थ्यांना सुविधा 

शाळेच्या इमारतीची दुरुस्ती व्हावी या करता पालिका प्रशासन तसेच जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्याप यश आलेले नाही.

सुरेखा मोकल, मुख्याध्यापक