शेकापच्या वतीने दहावी आणि बारावी मधील नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

 शेकापच्या वतीने दहावी आणि बारावी मधील नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न


शेतकरी कामगार पक्षाच्या कार्याचा अभिमान वाटतो

- यशवंत गोसावी

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने येथील विरूपाक्ष मंगल कार्यालयाच्या भव्य सभागृहामध्ये शैक्षणिक वर्ष २०२२- २३ मध्ये झालेल्या १० वी आणि  १२वी परीक्षांच्यात नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. रविवार दिनांक १८ जून रोजी झालेल्या या शानदार समारोहात सुप्रसिद्ध व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी आमदार विवेक पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त या भव्य गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

            विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात १० वी आणि १२ वी च्या परीक्षा मैलाचा दगड ठरत असतात. उच्च शिक्षणाची पाळंमुळे याच परीक्षांमध्ये रुजलेली असतात. म्हणूनच या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले असते. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची परंपरा शेतकरी कामगार पक्ष तीन दशकांहून अधिक वर्षे कालावधी मध्ये जपत आलेला आहे. यंदाच्या वर्षी गुणगौरव समारंभामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध करियर गायडन्स एक्सपर्ट यशवंत गोसावी यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीतील व्याख्यानातून विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध असणारे उच्च शिक्षणाचे अनेक पर्याय उलगडून दाखवले. तसेच माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे जे कार्य करत आहे त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

         या गुणगौरव समारंभात सुशील मुणगेकर यांनी "व्यवसाय स्फूर्ती" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यवसायाभिमुख शिक्षणाची निवड केल्यास स्वतःचा व्यवसाय उभारणे सहज शक्य असते. चाकोरीबद्ध रोजगारांच्या पाठीमागे धावण्यापेक्षा रोजगार निर्माण व्यवसाय करणारे बना! असा सल्ला त्यांनी विद्यार्थी मित्रांना दिला. या समारंभात ६४९ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. आकर्षक सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, उत्तम दर्जाचे पेन आणि दहावी व बारावी नंतरच्या शैक्षणिक पर्यायांचे पुस्तक देऊन नाही नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

        गुणगौरव समारंभासाठी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काशिनाथ पाटील, बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे नवनिर्वाचित संचालक, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.



चौकट

या गुणगौरव समारंभामध्ये नेरे येथील निवासी असणारी सायली श्याम ठाकूर तिची रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याप्रित्यर्थ तिचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देण्यात येतो. हा मानाचा समजला जाणारा पुरस्कार मिळविल्याबद्दल मनोहर महादेव पाटील यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. तर अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रबंध पूर्ण करून पीएचडी मिळवणारे भूषण ठाकूर यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.