श्री क्षेत्र पंचायतन मंदिराचा प्रथम वर्धापन दिन साजरा
पनवेल : जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा शनिवार, १३ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त येथे दिवसभर विविध सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री क्षेत्र पंचायतन मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त धार्मिक,सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. शनिवारी सकाळी ६ वाजता पंचायतन मंदिरांमधील पूजन आणि आरती, ९ते ११ या वेळेमध्ये कीर्तनाचार्य ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन पार पडले. तर ११ ते दुपारी ४ या वेळी सर्व भाविकांसाठी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे दर्शन श्री क्षेत्र पंचायतन मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसाद आणि संगीत चक्रीभजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी ३ वाजता भजनसंध्याच्या आयोजनानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेमध्ये श्रींची पालखी मिरवणूक दिंडी सोहळा व हरिपाठ झाल्यानंतर ७ वाजता संगीत भजनाच्या माध्यमातून वर्धापन दिनाच्या दिवसाची सांगता करण्यात आली.या सर्व कार्यक्रमांना पनवेल, उरण,नवी मुंबई, मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील असंख्य भाविकांनी गर्दी केली होती. त्यांचे म्हात्रे कुटुंबीयांकडून स्वागत करण्यात आले.हे मंदिर धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे.पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे आणि त्यांचे चिरंजीव प्रीतम म्हात्रे यांनी नढाळ येथे श्रीगणेश, श्री साईबाबा, श्री मारुती,भगवान श्री शंकर शिवलिंग आणि आई भवानी माता मंदिराची स्थापना केली आहे. दररोज या ठिकाणी अनेक भक्तगण दर्शनाला येतात.या वेळी मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.