नैनाविरोधात आंदोलन तापले; माजी आ. बाळाराम पाटील यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांना अटक

 


पनवेल तालुक्यातील 23 गावांमध्ये नैना प्रकल्प येऊ घातलेला असून, याविरोधात येथील शेतकर्‍यांनी एल्गार पुकारला आहे. कोणत्याही प्रकारे भूखंड हस्तांतरण होऊ देणार नाही, असा निर्धार शेतकर्‍यांनी केला असून, याविरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र, शेतकर्‍यांच्या विरोधाला न जुमानता आज देवद येथे नैनातर्फे भूखंड हस्तांतरण कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला. यावेळी शेतकर्‍यांनी प्रखर विरोध दर्शवत हा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस बळाचा वापर करण्यात आला. पोलिसांनी बाळाराम पाटील यांच्यासह अनेक शेतकर्‍यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

देवद येथील सर्वे नंबर 78/0 या जागेचा नैनातर्फे प्लॉट हस्तांतरण करण्यात येत होते. याला येथील शेतकरी बांधवांनी प्रखर विरोध केला. वेळ पडली तर रक्त सांडवू, मात्र जमीन फुकटात देणार नाही, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी देखील शेतकर्‍यांची भूमिका स्पष्ट केली आणि या भूखंड हस्तांतरण कार्यक्रमाला जाहीर विरोध दर्शवला. हा प्रकल्प होऊ देणार नाही, आपण अटक करून घेऊया, अशी रोखठोख भूमिका जी.आर. पाटील यांनी मांडली.

नैना ही उद्योगपतीला विकले गेले आहे का आणि कायद्याचे रक्षक हे भक्षक झाले आहेत का, असा सवाल पाटणकर यांनी केला. यावेळी अनेकांनी आमची जमीन फुकट न घेता जमीन अधिग्रहण करा, असे ठणकावून सांगितले. तर सुकापूर येथे 30 माळ्यांची इमारतीचे काम सुरू आहे. त्याला विमान अडकणार नाही आणि शेतकर्‍यांनी बांधलेल्या चार माळ्यांच्या इमारतीला कोणते विमान अडकणार आहे, असा सवाल राजेश केणी यांनी उपस्थित केला. यावेळी नैनासोबत नियोजन बैठक लावण्याची मागणी करण्यात आली. तर 78/0 सर्व्हे नंबर असलेला प्लॉट 23 कोटी रुपयांना विकला गेला असल्याचे सांगण्यात आले.

सिडकोच्या माध्यमातून बैठक लावण्यात येणार असल्याचे दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी माजी आमदार बाळाराम पाटील, जी.आर. पाटील, राजेश केणी, सुभाष भोपी, नामदेव फडके, शेखर  शेळके यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांना अटक केली. काही काळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

वेळ आली तर रक्त सांडवू आणि स्थानिकांचा विचार न करता इतरांचा विचार केला तर वेगळ्या पद्धतीने आम्हाला विचार करावा लागेल. स्थानिकांचा विचार करूनच पुढचा निर्णय घ्या अन्यथा पुढचे आंदोलन उग्र असेल.
– माजी आमदार बाळाराम पाटील