एपीएमसीत भाज्या दरात वाढ

 एपीएमसीत भाज्या दरात वाढ

नवी मुंबई 

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी भाजीपाल्याचे दर वधारले असून शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडीच्या दरात १०% ते १५% वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस आणि अतिउष्णतेमुळे भाज्यांचे उत्पादन कमी झाले असून दर वाढले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. अवकाळी पाऊस आणि हवामानात होणारे बदल त्यामुळे उत्पादन कमी झाले असून भाज्यांच्या दर्जावर ही परिणाम झाला आहे. एपीएमसी बाजारात आवक कमी होत असून उच्चतम प्रतीच्या भाज्यांचे दर वधारले आहेत.

एपीएमसीत मंगळवारी ५९४ गाड्यांची आवक झाली असून यामध्ये शिमला मिरची, फरसबी, वांगी आणि काकडीची आवक घटल्याने दर १०% ते १५% वाढले आहेत,अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. मंगळवारी एपीएमसीत काकडी ३९२ क्विंटल आवक, शिमला मिरची १४८२ क्विंटल, फरसबी ७६ क्विंटल, वांगी ३२३क्विंटल, वाटाणा १०४५क्विंटल, आवक झाली आहे. टोमॅटो, गवार, भेंडी, कोबी, फ्लॉवर, गाजराचे दर स्थिर असून हिरवी मिरची,हिरवा वाटाणा दर उतरले आहेत, तर शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडीच्या दरांनी उसळी घेतली आहे. 

आधी घाऊक बाजारात फरसबी प्रतिकिलो ४०-४५रुपयांनी उपलब्ध होती त्यामध्ये १० रुपयांची वाढ झाली असून आता ५०-५५ रुपयांनी विक्री होत आहे. प्रतिकिलो शिमला मिरची आधी २०-२२रु होती ती आता ३०-३२रुपयांनी विकली जात आहे. प्रतिकिलो काकडी १२-१४ रुपयांवरून १६-१८रुपये तर वांगी प्रतिकिलो १२रुपये होती आता १६ रुपयांनी विकली जात आहेत. एकंदरीत या भाज्यांची १०% ते १५% दरवाढ झाली आहे, तर हिरवी मिरची आणि मटारचे दर मात्र घसरले आहेत. आधी वाटाणा प्रतिकिलो ८० रुपये होता ते आता ६० रुपयांवर उपलब्ध आहे तर हिरवी मिरची १६-२० रुपयांनी विक्री होत आहे.#apmcmarket #vashi #vegitablesrate #navimumbai Navi Mumbai City