वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे नमुंमपा आयुक्त नार्वेकर यांचे आवाहन

 वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे नमुंमपा आयुक्त नार्वेकर यांचे आवाहन

नवी मुंबई 

   सद्यस्थितीत वातावरणातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे प्रकृतीवर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी उन्हात कामाशिवाय घराबाहेर पडू नये व स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

   वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले की माणसाच्या शरीरातील तापमान नियंत्रण यंत्रणा प्रभावीपणे काम करेनाशी होते आणि उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ व उलट्या होणे, डोके दुखणे, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे, प्रसंगी आकडी येणे अशी विविध प्रकारची लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी घाबरून न जाता तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्राशी, रुग्णालयाशी संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.  सध्या तापमानातील प्रचंड वाढीमुळे उष्णतेचे आजार व उष्माघात टाळण्यासाठी तहान लागलेली नसली तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणे, हलके पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरणे, बाहेर जाताना गॉगल, छत्री अथवा टोपी, बूट अथवा चप्पल यांचा वापर करावा तसेच प्रवास करताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवावी असेही आवाहन करण्यात येत आहे. उन्हात काम करणा-या व्यक्तींनी डोक्यावर टोपी अथवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे जाणवल्यास ओआरएस, घरी बनविलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक अशी पेये नियमित घ्यावीत.   महापालिका आयुक्त यांचे निर्देशानुसार उष्माघाताच्या रूग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळ येथे विशेष उपचार कक्ष सुरू करण्यात आलेला आहे.

 उष्णतेचा वा उष्माघाताचा त्रास नागरिकांना जाणवल्यास त्वरित महानगरपालिकेच्या रुग्णालयाशी किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. Navi Mumbai Municipal Corporation Navi Mumbai City Navi Mumbai