मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ११ वाहनांचा विचित्र अपघात

 मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ११ वाहनांचा विचित्र अपघात

मुंबई 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ११ वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे. या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून पोलिसांकडून वाहतूक व्यवस्था मार्गी लावण्याचे काम सुरु आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहतुक व्यवस्था ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात झालेल्या वाहनांमध्ये कार, ट्रक, अवजड वाहनांचा समावेश असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करुन उपचार करुन पाठविण्यात आले असून एका जखमीला पुण्यातील ससुन रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबी टीमने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे. एका ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने अथवा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हा ट्रक मुंबईच्या दिशेने येत होता.  या ट्रकने वाहनांना धडक दिली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. #mumbaipuneexpressway #MumbaiPuneHighway