उरण-पनवेल मार्गावरील खाडीपूल दुरुस्तीची प्रतीक्षा
पनवेल
उरण येथील उरण-पनवेल मार्गावरील खाडीपुलाच्या दुरुस्तीचे काम हे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. मात्र भरतीचे पाणी आणि धिम्या गतीने सुरू असलेल्या कामामुळे पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येथील चार गावांतील हजारो नागरिकांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दोन वर्षांपूर्वी नादुरुस्त म्हणून बंद करण्यात आलेल्या उरण-पनवेल महामार्गावरील खाडीपुलाच्या दुरुस्तीचे काम मे महिन्यात पूर्ण करण्याचे सिडकोने निश्चित केले होते. मात्र एप्रिल महिना संपत आला असतानाही काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार का, असा सवाल येथील नागरिक व प्रवाशांकडून केला जात आहे.
उरण-पनवेल महामार्गावरील सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयासमोरील फुंडे स्थानकाजवळील खाडीपूल नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे जड वाहनांचा अपघात होण्याची शक्यता असल्याने हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी बंद केला आहे. यामध्ये या मार्गाने ये-जा करणाऱ्या एसटी व एनएमएमटीच्या सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा देणाऱ्या वाहनांनाही बंदी केली आहे. त्यामुळे या परिसरातील चार गावांच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर जड व अधिक उंचीच्या वाहनांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांतील २० पेक्षा अधिक टेम्पोंना अपघात होऊन काही जण जखमी तर एका महिलेचा मृत्यूही झाला आहे. #uranpanvel #brij #PMC #panvelkar