स्थानक विकासासाठी एसटी प्रवासी आक्रमक निम्म्या
राज्याला जोडणाऱ्या, एसटी महामंडळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या पनवेल आगाराचा पुनर्विकास मागील १० वर्षांपासून रखडला आहे. प्रवाशांच्या समस्यांसाठी ४५ वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या पनवेल प्रवासी संघाला केवळ आश्वासने देणाऱ्या एसटी महामंडळाच्या निषेधार्थ गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.महाविकास आघाडीने ताकद दिलेले हे आंदोलन यापुढे शांततेच्या मार्गाने न करता आक्रमकपणे केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.पनवेल आगारात दररोज सुमारे चार हजार एसटी बसची ये-जा होते. मुंबई विभागातील आगारांपैकी उल्लेखनीय उत्पन्न देणारे आगार म्हणून पनवेलचीओळख आहे. परंतु आगारातील मुख्य इमारत धोकादायक असल्याचे घोषित करून इमारत पाडण्यात आली.तेव्हापासून आगाराची दुर्दशा सुरू आहे. प्रवाशांना उभे राहण्यासाठी शेडचा आसरा घ्यावा लागतो. स्वतःआगारप्रमुख गॅरेजमध्ये बसून कारभार हाकतात. अनेक वर्षांपासून पनवेलआगारात विमानतळाच्या धर्तीवर बसपोर्ट बनणार, अशी आश्वासने दिली जात आहेत. परंतु मागील १३ वर्षांपासून आगाराची एक वीटही रचली गेली नाही. पनवेल प्रवासी संघाने वारंवारपाठ पुरावा केल्यानंतर महिनाभरात कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन देऊन चालढकलपणा केला जातो. दोन महिन्यांपूर्वी संघाने दिलेल्या पत्राला पुन्हा आश्वासन दिल्यानंतर यावेळी अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे यांनी आंदोलनचा इशारा दिला होता. ठरल्याप्रमाणे गुरुवारी आंदोलन करण्यात आले. १५वर्षे पनवेलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार प्रशांत ठाकूर यांचे अपयश असल्याचा आरोप करीत शेकाप,काँग्रेस, राष्ट्रवादीने या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. गुरुवारी एसटी धरणे आंदोलनात स्थानकात पनवेलमधील सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्षांचे नेते,सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू,भाजपच्या बंडखोर माजी नगरसेविका लीना गरड उपस्थित होते.'महिनाभरात काम सुरू करू'आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महामंडळाच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय रेडेकर यांनी धरणे आंदोलन न करण्याची विनंती केली होती. परंतु विनंतीला न जुमानता आंदोलन करण्यात आल्यामुळे त्यांनी प्रवासी संघाच्या आंदोलनाला भेट दिली. सर्वांच्या विनंतीनुसार पुढील सात दिवसांत आगार पुनर्विकासाची प्रक्रियेची लेखी माहिती देऊन १५ दिवसांत वरिष्ठांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन रेडेकर यांनी दिले.धनाढ्य लोकप्रतिनिधींना वेदना समजणार नाही शेकाप नेते बाळाराम पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली. या आगारातून आम्ही कॉलेजला गेलो आहे.येथील प्रवाशांच्या समस्या आम्हाला माहिती आहेत, परंतु सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकप्रतिनिधींना सर्वसामान्य प्रवाशांच्या वेदना कशा समजतील, अशी टीका केली.