दंडाच्या नावाखाली पनवेल महानगरपालिकेत होतोय लाखोंचा गैरव्यवहार, विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांचा आरोप
दंडाच्या नावाखाली पनवेल महानगरपालिकेत होतोय लाखोंचा गैरव्यवहार, विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांचा आरोप
पनवेल : दंड म्हणून वसूल केलेल्या पैशांमध्ये नागरिकांना घाबरवून पावतीपेक्षा जास्त पैसे उकळून दररोज मोठा गैरव्यवहार होत आहे असे आरोप विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केले आहेत. त्याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, गेले काही दिवस पनवेलमधील नागरिकांच्या त्यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या की, पावती कमी रकमेची देऊन जास्त पैसे उकळले जात आहेत, परंतु यासंदर्भात कोणताही पुरावा त्यांच्याजवळ नव्हता म्हणून प्रीतम म्हात्रे यानी त्यांच्या काही सहकाऱ्यांना सांगितले होते की या संदर्भात थोडी माहिती घ्या. शनिवार दिनांक 19 मार्च 2022 रोजी पनवेल एस.टी. स्थानक आणि पनवेल रेल्वे स्थानक परिसरात पनवेल महानगर पालिकेचे अधिकृत असलेले मार्शल ज्यांच्याजवळ पालिकेची रिसीट देण्याचे अधिकृत मशीन आहे आणि पालिकेचे ओळखपत्र सुद्धा आहे ते नागरिकांकडून, तेथील फेरीवाले तसेच दुपारच्या वेळी ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांकडून जास्त पैसे उकळण्याचे काम करत आहेत, हे समजताच त्याठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला आणि या विषयातील सर्व पुरावे गोळा केले आहेत.
पैसे गोळा करण्याच्या पद्धतीबाबत सांगताना प्रितमम्हात्रे म्हणाले की, ही लोकं सामान्य नागरिकांना हेरतात आणि त्यांना पकडून सांगतात की तुम्ही नियम तोडला आहे. तुम्हाला दोन हजार रुपये दंड आहे, सातशे ते हजार रुपये भरा, तुम्हाला पाचशे रुपयाची पावती अधिकृतपणे मिळेल आणि मास्क न घालने, सार्वजनिक ठिकाणी घाण करणे अशा आरोपामधून निर्दोष सोडण्यात येईल. अशावेळी नागरिकांना घाबरवून रोख रक्कम सातशे ते एक हजार रुपये घेऊन फक्त पाचशे रुपयेची पावती त्यांना देण्यात येते, वरील जादा जमा झालेले दोनशे ते पाचशे रूपयेची रक्कम ही नक्की कोणाच्या खात्यात जमा होते? याची माहिती सामान्य नागरिकांकडे उघड झाली पाहिजे. तसेच यामध्ये प्रशासन किंवा इतरही कोण सामील आहे का? याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे?
या कामासाठी नेमलेल्या 'मरीन सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स प्रायव्हेट लिमिटेड' या एजन्सीचे त्वरित काम काढून घेऊन त्यांना दंड सुद्धा आकारण्यात यावा आणि यावर जनतेची लूट केल्याबद्दल फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यानी केली आहे.