धुळवड साजरी केल्या नंतर खारघर मधील मुलांनी केली रहिवाशी संस्थेत साफसफाई

 आम्ही घाण केली, आम्हीच साफ करणार


धुळवड साजरी केल्या नंतर खारघर मधील मुलांनी केली रहिवाशी संस्थेत साफसफाई

ता.19 - धुळवड साजरी करताना रहिवाशी संस्थेच्या आवारात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाल्याचे लक्षात आल्याने धुळवड खेळणाऱ्या मुलांनीच स्वतः संस्थेच्या आवारातील कचरा साफ केल्याने, मुलांचे हे काम पाहून रहिवाशी संस्थेतील रहिवाशांनी मुलांच्या या कामाचे कौतुक केले.दर वर्षी धुळवड हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात येत असतो. धुळवडी निमित्त विविध रंगांची उधळण करताना लहानग्यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो.मात्र मागील काही वर्षात धुळवड साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुगे आणि प्लास्टिक च्या पिशव्या वापरल्या जात असल्याने धूळवडीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असते.दर वर्षी प्रमाणे यंदा देखील शुक्रवारी ( ता.18) आलेली धुळवड पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. खारघर वसाहती मधील सेक्टर 15 मधील स्पॅगेटी रहिवाशी संस्थेत देखील साजऱ्या करण्यात आलेल्या धुळवडी मुळे रहिवाशी संस्थेच्या आवारात फुगे आणि प्लास्टिक च्या पिशव्याचा खच पडला होता. या वेळी दिवस भर रंगांची उधळण करून दमलेल्या संस्थेतील लहानग्यांच्या ही गोष्ट लक्षात येताच सर्व लहानग्यानी मिळून संस्थेचे आवार स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला व साफ सफाई च्या कामाला सुरवात केली. या वेळी संस्थेतील काही मोठ्या लोकांनी दुसऱ्या दिवशी सफाई कामगार येतील आणि साफ सफाई करतील असं सांगत सफाई करणाऱ्या लहानग्याना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही कचरा केलाय त्या मुळे तो आम्हीच साफ करणार या हट्टावर ठाम असलेल्या अभिनव,सिद्धि पवार,दिशा,हिमांशी, आदित्या ,काव्या,गरिमा,सांजी इ. छोट्या मुलांनी संपूर्ण रहिवाशी संस्था स्वच्छ केल्याने उत्स्फूर्त पणे सफाई काम करणाऱ्या या मुलांची प्रशंसा करत,कौतुकाची थाप दिली आहे.