प्रितम म्हात्रे ॲक्शन मोडमध्ये..!
महाविकास आघाडीचे सर्व शिलेदार भाजपाला धोबीपछाड करण्याच्या तयारीत..
विकास कामांचे उद्घाटन वर भर न देता. जी कामे सुरू आहेत त्या कामांवर गुणवत्तेच्या दृष्टीने लक्ष देऊन बजेटमध्ये पूर्ण कसब लावून नागरिकांचा पैसा योग्य त्या ठिकाणी वापरला जाईल या गोष्टीवर विरोधी पक्ष लक्ष देताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यात विरोधी पक्ष नेते श्री.प्रीतम म्हात्रे यांनी पनवेलची ओळख असलेली तलाव यांकडे आपला मोर्चा सुरू केला आणि नुसत्या सूचना न देता त्या काटेकोरपणे पाळल्या जात आहेत की नाहीत यावर सुद्धा लक्ष ठेवले . तसेच वृद्ध आणि लहान मुलांसाठी असलेल्या उद्यानांच्या विकासकामां मधील निकृष्ट दर्जाच्या कामांवर सुद्धा पाहणी करून पालिकेवर सदर ठेकेदाराला काम योग्य त्या पद्धतीने करण्यासाठी दडपण आणले. दुसऱ्या बाजूला आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये नगरसेवक गणेश कडू यांनीसुद्धा वेळोवेळी सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाला धारेवर धरले. पर्यावरण आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ज्येष्ठ नगरसेवक श्री अरविंद म्हात्रे यांनी कोर्टामध्ये सुद्धा प्रकरण नेऊन नागरिकांच्या बाजूने सर्व ताकदीनिशी विरोधी पक्ष उभा आहे याची जाणीव करून दिली. राष्ट्रवादीचे नगरसेवक श्री सतीश पाटील यांनीसुद्धा बऱ्याच ठिकाणी अंधाधुंद चाललेला कारभार पालकमंत्र्यां पर्यंत पोहोचवून पालिकेवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. अशाप्रकारे आक्रमक झालेल्या विरोधी पक्ष नेते श्री.प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखालील पनवेल महानगरपालिकेमधील महाआघाडी चे नगरसेवक यापुढे सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडतील यात शंका नाही.
दुसरीकडे सत्ताधाऱ्यांमध्ये महानगरपालिकेतील विविध समितीच्या सदस्य निवडी बाबत नाराजी नाट्य वेळोवेळी समोर आले. सुचवलेली नावे अचानक बदलण्यात आली काही लोकांनी राजीनामा नाट्य सुरू केले . युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष यांच्या वार्डात तर वेळोवेळी स्थानिक नेत्यांनी त्यांना बॅनर वरूनच डावलले. काही दिवसापूर्वी भाजपा नगरसेविका भाजप आता एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे असा खुलेआम आरोप करत नागरिकांच्या बाजूने टॅक्स विरोधात लढा देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या फोरमवर लक्ष केंद्रित केले , त्यामुळे भारतीय जनता पार्टी कडून त्यांना निलंबित करण्यात आले याबद्दल सुद्धा नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.
एकूणच पाहता पनवेलमधील राजकारणात सर्व काही आलबेल नाही. विरोधक शांतपणे एक एक खेळी खेळत आहेत आणि भाजप खेळलेल्या खेळांमध्ये गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत असे एकंदरीत चित्र आहे.