संरक्षण घराचे महत्त्व जिवणाचे

शेकापचा आवाज ! संजय महाडिक
 सरंक्षण घराचे आणि महत्व जिवाचे
दि.३ मे २०२०


घरकुलवासीयांनो, आतातरी 
सुरक्षेचे गांभीर्य ओळखाल काय? 


प्रवेशद्वारावर ना गेट ,ना सुरक्षारक्षक. त्यामुळे घरकुल कॉलनीत कोरोनाला सहज शिरकाव करता आला. कोरोनाने शिरकाव केला आणि तिघांना गाठले, एकाचा बळी देखील घेतला. कदाचित, कोरोनाच्या वाहकाला आपल्याला घरकुलच्या प्रवेशद्वारावरच रोखता आले असते. मात्र, सुरक्षेबाबतची उदासीनता आणि    गांभीर्याच्या आभावामुळे घरकुलला मोठी किंमत मोजावी लागली. आतातरी आपण गंभीर होणार आहोत का? कारण भविष्यातील धोके ओळखण्यासाठी आणि रोखण्यासाठी घरकुलच्या सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न गांभीर्याने सोडवावा लागेल.


दीड हजार कुटुंबांची सिडको निर्मित मोठी कॉलनी अर्थात खारघर येथील घरकूल वसाहत होय.  फक्त या एका  कॉलनीत सुमारे दहा हजारच्या घरात लोकवस्ती राहते. मात्र, मागील २० वर्षात येथील रहिवाशांना सुरक्षा व्यवस्थेचे गांभीर्य कळलेले नाही. एवढ्या मोठ्या मास हौसिंग सोसायटीला चार प्रवेशद्वार आहेत. मात्र, मागील २० वर्षात सुरक्षा रक्षक  नेमण्याबाबत गांभीर्याने न घेतल्याने "आवो -जावो घर तुम्हारा"असेच चित्र आहे. 
कोरोना विषाणूचा जेव्हा घरकुलमध्ये शिरकाव झाला तेव्हा घरकूल भयभीत झाले. अगदी हादरून गेले. आता तरी घरकुलच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत लोकं गंभीर होणार आहेत का?  या मूळ प्रश्नांची उकल आता तरी होणार आहे काय? घरकूल कॉलनीतील पदाधिकारी , पुढारी आतातरी याबाबचे गांभीर्य दाखवतील असा खरा प्रश्न आहे. स्व:रक्षणाचा धडा आता तरी घेतील काय?
महाराष्ट्र शासनाने सिडकोच्या माध्यमातून २००० साली खारघर सेक्टर १५ मध्ये घरकूल वसाहत निर्माण केली . सिडकोने बांधलेल्या या मास हौसिंग योजनेत प्रामुख्याने अल्प उत्पन्न आणि मद्यम उत्पन्न गटातील लोकांना प्राधान्य देण्यात आले होते. साधारणतः २००१ साली लोकं इथे रहायला आली. खरं तर आरंभीपासूनच घरकूल वसाहत शापित राहिलेली आहे. जणू काही घरकुलला कोणी वालीच नाही ,असे बांधकाम दरम्यान सिडकोने गांभीर्याने लक्ष दिले नाही. तेव्हा सिडकोने दुर्लक्ष केले, म्हणून घरकुलच्या बांधकाम काँट्रॅक्टरने घरकुल बांधताना निकृष्ट दर्जाचे काम केले. घरांचा ताबा मिळताच सुरू झालेल्या पावसाळ्यात घरकूल तग धरू शकले नाही. छतापासून ते फ्लोरिंग पर्यंत आणि भिंतीपासून ते खिडक्यांपर्यंत भयानक गळती सुरू झाली. कर्जाचा बोझ्या डोक्यावर घेऊन घरकुलमध्ये पाय ठेवलेल्या सदनिकाधारकांची सपशेल फसवणूक झाली होती. मोठ्या संघर्षाने प्रश्न सुटत आहेत.
एवढा मोठा संघर्ष घरकुलवासीयांच्या साक्षीला असताना सुरक्षा व्यवस्थेच्या नावाने बोंबाबोंब असणे हे मोठे आश्चर्यकारक आहे.
घरकूल वसाहतीची सुरक्षा २० वर्षांपासून वाऱ्यावर आहे. राहिवाशांप्रमाणे बाहेरील कोणतीही व्यक्ती कशीही घरकूल मध्ये प्रवेश करते. कुठे ही थांबते. बाहेरच्या गाड्या बिधास्तपणे घरकूलच्या आवारात शिरतात. टपोरी गँग घरकुलच्या उद्यानात शिरकाव करण्याचे धाडस करते. डी मार्ट मध्ये येणारी मंडळी जणू घरकूल सार्वजनिक मालमत्ता आहे असे समजून आपल्या गाड्या घरकूल आवारात उभ्या करून खरेदीला जातात. एवढेच काय ,अनोळखी लोकं आपल्या गाड्या घरकूलच्या आवारात कोणत्याही ठिकाणी चार चार, आठ आठ दिवस गाड्या पार्क करून जातात. घरकूलवासीयांच्या उदासीनतेमुळे अनुचित प्रकार घडण्यासाठी असे वातावरण निर्माण झाले आहे. थोडेसे पैसे वाचविण्यासाठी घरकुलवासीयांनी आपली, आपल्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात का घातली आहे? मागील अनेक वर्षात घरकुलमध्ये चोऱ्या झाल्या, लूटमार झाली. मात्र, सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरच आहे. हा धोका भविष्यात विध्यार्थी, मुली,महिलांच्या पथ्यावर पडण्याची अधिक भीती आहे.
कोरोनाने कदाचित असाच शिरकाव केला. कोरोनाचा हल्ला कधी झाला हे कळले नाही. घरकुलवासीयांचे प्राण वाचविण्यासाठी महापालिका आयुक्त गणेश देशमुख आणि पोलीस प्रशासनाला घरकूल सील करावे लागले. एवढेच नाही त्यासाठी खाजगी रक्षक नेमले. परंतु जर घरकूल सोसायटी प्रशासनाने याबाबत अगोदरच गांभीर्य दाखवले असते तर चित्र वेगळे असते. 
घरकूल वसाहतीला चार प्रवेशद्वार आहेत. एबीसीडी अशा चार सोसायट्या आहेत. प्रत्येक सोसायटीने एका प्रवेशद्वाराची जबाबदारी घेतली तरी हा प्रश्न चुटकीशी सुटणार आहे. परंतु घरकलवासी, तिथे कार्यरत असलेल्या चारही सोसायट्यांचे पदाधिकारी, फेडरेशन, स्थानिक नेते याबाबत गांभीर्य दाखवतील का? हा महत्वाचा प्रश्न आहे.