खारघरमधील मुंबई पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण;

पनवेल : खारघर येथे राहणाऱ्या मुंबई पोलीस कर्मचाऱ्याला तसेच कामोठ्यातील एका ५९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ३९ वर पोहचली आहे. दरम्यान, ३९ कोरोनाबाधित रूग्णांपैकि १३ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती पनवेल महापालिका प्रशासनाने दिली आहे.
        काल (सोमवार, २० एप्रिल) अष्टविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टराला आणि संबंधित डॉक्टरकडे उपाचार घेतलेल्या कळंबोलीतील एका पेशेंटला तसेच शिवडी येथे क्लिनीक असलेल्या खारघरमधील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली होती. त्यानंतर आज (मंगळवार, २१ एप्रिल) पनवेल महापालिका हद्दीत आणखी २ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पनवेल महापालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामधील एक व्यक्ती खारघर येथे राहणारी मुंबई पोलीस कर्मचारी असून कामानिमित्त खारघर ते बांद्रा प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय कामोठे येथील ५९ वर्षांची १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे. या रुग्णास अगोदरपासूनच मुत्र विकाराचा व रक्तदाबाचा त्रास आहे.
        दरम्यान, पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ३९ कोरोनाबाधित रूग्णांपैकी खारघरमधील २, कामोठ्यातील ३ आणि कळंबोली येथील ८ रूग्ण पुर्णपणे बरे झाले असल्याची माहिती पनवेल महापालिका प्रशासनाने दिली आहे.