नवी मुंबई एपीएमसी मार्केटचे खारघरमध्ये स्थलांतर; गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

खारघर: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी हे मार्केट तात्पुरत्या स्वरूपात खारघरमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. खारघरमधील सेन्ट्रल पार्कच्या बाजू असलेल्या जवळपास ५० एकर मैदात हे मार्केट लवकरच सुरू होणार आहे. निरंकारी संत समागम सोहळ्यासाठी वापरण्यात आलेले सेक्टर २८, २९ मधील भूखंड सिडकोने तात्पुरत्या स्वरूपात भाजी मार्केट स्थलांतर करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये १ हजार चौरस फुटाचे जवळ १२०० ते १३०० गाळे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
        मुंबई, नवी मुंबई परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. भाजी मार्केटमधील होणारी गर्दी पहाता, कोरोनाचाप्रसार होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी आटोक्यात आणण्यासाठी भाजी मार्केट खारघरमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या भुखंडाची साफसफाई करून तेथे भाजी मार्केट उभारण्याचे काम सुरू असून लवकरच हे याठिकाणी मार्केट सरू होणार आहे.