कोरोना प्रतिबंधासाठी खारघर
मधील घरकुल सोसायटी सील !
प्रतिनिधी, पनवेल : मागील पंधरा दिवसात खारघर मधील घरकुल मास हौसिंग सोसायटीत तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने पनवेल महापालिका प्रशासनाने गुरुवारी सील केली. पनवेल महापालिका आयुक्त डॉ गणेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश आज जाहीर केले.
पनवेल महापालिका क्षेत्रात मागील काही दिवस कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यात पनवेल महापालिकेला यश आले होते. मात्र, बुधवारी अचानक एक रिक्षाचालक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. सदर रिक्षाचालक घरकुल सोसायटीत राहणारा आहे.
घरकुल ही सुमारे दीड हजार सदनिका असलेली मास हौसिग सोसायटी आहे. इथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने पुन्हा संसर्ग होऊ नये याबाबत खबरदारी घेत पालिका आयुक्त डॉ गणेश देशमुख यांनी घरकुल सील करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत येथील परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत घरकुल मधील रहिवाशांना बाहेर जाण्यास बंदीघालण्यात आली आहे. यादरम्यान बाहेरील नागरिकांना घरकुल मध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जीवनावश्यक व्यवहार मात्र सुरू राहणार आहे. घरकुलवासीयांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.